Belagavi

काळ्या दिनाच्या यशानंतर कन्नड संघटनांचा तिळपापड

Share

१ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारविरोधात पाळण्यात येणारा काळ्या दिनी मराठी भाषिकांची झालेली गर्दी पाहून युवा कर्नाटक वेदिका या कन्नड संघटनेने पोलीस विभागाला लक्ष्य केले आहे

एकीकडे परवानगी देणार नाही असे सांगून पोलीस विभागाने परस्पर परवानगी दिली असे कारण पुढे करत पोलीस प्रशासना विरोधात या संघटनेने आंदोलन छेडले. राणी चन्नम्मा चौकात टायर पेटवून आंदोलनकर्त्यांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर पोलीस प्रशासन आणि समिती नेत्यांविरोधात विरोधात घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना तडीपार ची नोटीस देऊनही हे नेते मोर्चामध्ये सहभागी झाले याचे कारण पुढे करत पोलीस विभागाचे हे अपयश असल्याचा आरोप कन्नड संघटनांनी केला.

यावेळी समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी मराठी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर देखील आग पाखड करत समितीनेते शुभम शेळके यांच्यासमवेत सेल्फी काढून घेणाऱ्या सीपीआय कालीमिरची यांच्यावरही निलंबनाच्या कारवाईची मागणी केली आहे.

युवा कर्नाटक वेदिकेचे राज्य अध्यक्ष रुपेश राजा यांना बेळगाव शहरात प्रवेश नाकारला. राजकारण्यांच्या दबावामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी हातबल झाले असून समितीच्या नेत्यांना मोर्चामध्ये सहभागी होण्याची संधी कशी देण्यात आली याबाबतही या संघटनेने विरोधी प्रतिक्रिया व्यक्त केली.

युवा कर्नाटक वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आणि प्रशासनाला वेठीस धरत मराठी भाषिकांविरोधात पुन्हा एकदा टीकाटिप्पणी केली आहे.

Tags: