Belagavi

कर्नाटकी पोलिसांची दडपशाही : शुभम शेळकेंवर पाच लाख दंडाची कारवाई

Share

शुभम शेळके हे वारंवार पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करत असून त्यांचेवर बेळगाव शहराच्या विविध पोलिस स्थानकात १९ गुन्हे दाखल असून ते दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करत आहेत असा जावई शोधही या नोटीसीमध्ये एकतर्फी कारवाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाने काढला आहे.शुभम शेळकेंना दंड भरता आला नाही तर कारावासाची शिक्षा देण्यात येईल, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

२६ मार्च २०२५ रोजी शुभम शेळके यांना प्रतिबंधात्मक नोटीस देऊन तुरुंगात पाठविले होते, मराठी भाषिक व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात बेळगावात येऊन वेदिकेचा म्होरक्या नारायणगौडा याने गरळ ओकली होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून शुभम शेळके यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित करून गौडाचा खरपूस समाचार घेऊन निषेध नोंदवला होता, त्यावर माळमारुती पोलीस स्थानकात शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून पोलिसांनी दिलेल्या या तुघलकी नोटीसीला वकील महेश बिर्जे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.

या वेळी माळमारुतीचे सीपीआय जे. एम. कालिमिर्ची यांनी शुभम शेळके यांच्यासोबत सेल्फी घेतल्याच्या विषयावरही आयुक्तांनी भाष्य केले असून संबंधित सीपीआय जे.एम. कालिमिर्ची यांच्या कृत्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. शिवाय काळ्या दिनासाठी बेळगावमध्ये येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना देखील मज्जाव घालण्यात आला असून महाराष्ट्रातील नेते बेळगावमध्ये आल्यास त्यांच्यावर देखील तक्रार नोंदविली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी सुचवले आहे.

गेली सत्तर वर्षे लोकशाही मार्गाने लढणाऱ्या मराठी भाषिकांना कर्नाटक सरकारने केलेला भाषिक अत्याचार व अन्याय हा काही नवीन नाही, पण आता नेत्यांना व मराठीसाठी कार्यरत राहणाऱ्या युवकांना आर्थिक भुर्दंडात अडकवण्याचा कुटील डाव आखला आहे. पोलीस प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेला न जुमानता मराठी भाषिक नागरिक आणि नेत्यांनी मात्र काळा दिन यशस्वी करत पुन्हा एकदा आपली तीव्र लोकेच्छा आजच्या काळ्या दिनाच्या फेरीतून प्रकट केली आहे.

Tags: