विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील कन्नोळी गावाजवळच्या टोल नाक्यावर भाजप नेते विजु गौडा पाटील यांचा मुलगा समर्थ गौडा आणि त्याच्या मित्रांनी टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. टोलचे पैसे मागितल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

भाजप नेते विजु गौडा पाटील यांचा मुलगा समर्थ गौडा आपल्या काळ्या रंगाच्या ‘थार’ गाडीतून विजापूरहून सिंदगीकडे जात होता. यावेळी टोल कर्मचारी संगप्पा यांनी त्यांच्याकडे टोल शुल्क मागितले. त्यावर, आपण ‘विजु गौडा पाटील’ यांचा मुलगा आहोत, असे समर्थ गौडा यांनी सांगितले. ‘कोण विजु गौडा पाटील?’ असे संगप्पा यांनी विचारताच समर्थ गौडा आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीत जखमी झालेले कर्मचारी संगप्पा यांना सिंदगी तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. समर्थ गौडा यांच्या विरोधात टोल कर्मचाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.


Recent Comments