Hukkeri

लोकायुक्त नियमावलीबाबत तालुका पंचायत सभागृहात कार्यशाळा

Share

सरकारी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा करावी आणि सरकारी योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे, असे मत बेळगाव लोकायुक्तांचे अधिकारी व्यंकटेश यडहळ्ळी यांनी व्यक्त केले.

ते आज हुक्केरी शहरातील तालुका पंचायत सभागृहात आयोजित लोकायुक्त जागृती शिबिरात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध अधिकाऱ्यांमध्ये लोकायुक्त नियमांविषयी जनजागृती केली.

यावेळी तहसीलदार बळिराम कट्टीमनी म्हणाले, “सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे आलेल्या लोकांच्या समस्या समजावून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करावे.”

लोकायुक्त संस्थेचा उद्देश सरकारी अधिकारी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे आहे. यासाठी कर्नाटक लोकायुक्त संस्था प्रत्येक तालुका स्तरावर जागृती कार्यशाळा आयोजित करत आहे. “सरकारी यंत्रणेचा एक भाग म्हणून अधिकाऱ्यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे,” असे व्यंकटेश यडहळ्ळी यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी व्यासपीठावर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी टी. आर. मल्लाडद उपस्थित होते.

या शिबिराला लोकायुक्त कर्मचारी राजश्री भोसले, लगमण्णा होसमनी, धनंजय नायक तसेच हुक्केरी तालुक्यातील विविध विभागांचे अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते.

Tags: