Belagavi

बेळगावात जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५-२६ चे आयोजन

Share

सध्याची युवा पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. यातून बाहेर पडून त्यांनी सण-समारंभ, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय व्हावे. तसेच शिक्षक, पालक आणि ज्येष्ठांना आदराने वागवावे, असे आवाहन बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी केले.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग, ‘माय भारत’ केंद्र आणि संगोळ्ळी रायण्णा प्रथम श्रेणी घटक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज बेळगाव जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि शपथ देण्यात आली.

यावेळी बोलताना उत्तरचे आमदार आसिफ सेठ म्हणाले की, युवा महोत्सव हे युवकांमधील प्रतिभा दर्शविण्यासाठी एक व्यासपीठ आहेत. विविध विभागांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन याचा सदुपयोग करून घ्यावा. सध्याची पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. यातून बाहेर पडून सण-समारंभ, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय व्हावे. शिक्षक, पालक आणि ज्येष्ठांना आदराने वागवावे, असे आवाहन आमदार आसिफ सेठ यांनी केले.

राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सी. एम. त्यागराज म्हणाले की, व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे हे खरोखरच आनंदाचे आहे. युवा महोत्सव माणसाला प्रेरणा देतात. जीवनात प्रेरणा हीच शक्ती आहे. नवीन गोष्टींमुळे तुमच्यातील शक्ती विकसित होते आणि तिला जागतिक मान्यता मिळते. क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि कलाशक्ती वाढून तेच जीवनाचा अविभाज्य भाग बनते. असे मत प्रो. सी. एम. त्यागराज यांनी व्यक्त केले.

सीपीआय कालिमिर्ची यांनी ‘११२’ हेल्पलाईनचे महत्त्व आणि कार्य सांगितले. पोलीस ठाणी पूर्वी भीतीची केंद्रे होती, पण आता पोलीस विभाग ‘११२’ हेल्पलाईनद्वारे तुमच्या दारापर्यंत पोहोचेल. नागरिकांची समस्या ही पोलीस विभागाची समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी पोलीस विभाग नेहमीच सक्रिय असतो, असे स्पष्टीकरण सीपीआय कालिमिर्ची यांनी दिले.

उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सी. एम. त्यागराज, कुलसचिव संतोष कामगौड, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाचे उपसंचालक बी. श्रीनिवास, संगोळ्ळी रायण्णा कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. सी. पाटील, सीपीआय कालिमिर्ची यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags: