
सीमावर्ती बेळगाव शहर आणि परिसरात येत्या १ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘कर्नाटक राज्योत्सवा’च्या निमित्ताने औद्योगिक वसाहती तसेच शॉपिंग मॉल्समध्ये श्री भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेची पूजा करणे बंधनकारक करावे, अशी मागणी करत कर्नाटक रक्षण वेदिके (करवे) युवासेनेने बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

कर्नाटक रक्षण वेदिके युवासेनेतर्फे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज निदर्शने करण्यात आली. नव्हेंबर १ रोजी बेळगाव शहर आणि उपनगरातील औद्योगिक वसाहती तसेच शॉपिंग मॉल्समध्ये श्री भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेची पूजा सक्तीची करावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ आदेश काढावा, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. हा आदेश जिल्हा प्रशासनाने तातडीने जारी करावा, यासाठी करवेने दबावतंत्राचा वापर सुरू केला असून सीमाभागात कन्नड भाषेचे आणि संस्कृतीचे वर्चस्व दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा मराठी भाषिकांत सुरू आहे.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बाळप्पा गुडघेणट्टी यांनी आपली मागणी स्पष्ट केली. “येत्या १ नोव्हेंबर रोजी प्रत्येक औद्योगिक वसाहत आणि मॉलमध्ये नाडदेवता श्री भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करणे जिल्हाधिकाऱ्यांनी बंधनकारक करावे,” असे त्यांनी म्हटले.
यावेळी कर्नाटक रक्षण वेदिके युवासेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments