Belagavi

बेळगावात आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचाला आजपासून प्रारंभ

Share

बेळगाव येथील प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ५७व्या ‘फादर एडी मेमोरियल आंतरशालेय नॉकआऊट फुटबॉल टूर्नामेंट २०२५-२६’ ला आजपासून सुरुवात झाली आहे.

‘बीग व्हेंचर्स’, ‘प्रगती इन्फोटेक’, ‘द एक्स्पोलाईट्स असोसिएशन गोवा’ यांच्या सहयोगाने आणि ‘निशास इन्फिनिटी’च्या प्रायोजकत्वाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मेट्रोकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नागेश छाब्रिया, सुमुख छाब्रिया, फादर अलेन्द्रा डीकास्टो, फादर स्टीव्हन अलामेडिया, फादर मार्कोन बारेट्टो, ख्रिश्चन गोन्साल्व्हिस, तसेच ‘पोलाईट्स’चे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम नागेश छाब्रिया आणि सुमुख छाब्रिया यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

या स्पर्धेतील पहिला सामना बेळगावच्या मराठी विद्यानिकेतन आणि शेख सेंट्रल स्कूलच्या संघात झाला.

यावेळी बोलताना मेट्रोकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नागेश छाब्रिया यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. “स्पर्धेत जय किंवा पराजय महत्त्वाचा नसून, स्पर्धेत सक्रिय सहभाग घेणे महत्त्वाचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यानंतर बोलताना सुमुख छाब्रिया यांनी, “गेल्या वेळेस सेंट पॉल शाळेच्या फुटबॉल संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवला होता. यंदाही त्यांनी जिंकावे,” अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, त्यांनी ‘पोलाईट्स’ आणि माधव प्रभू यांच्यासह स्पर्धेच्या आयोजकांच्या कार्याची प्रशंसा केली. ” स्वर्गीय निशा छाब्रिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही ट्रॉफी देताना आपल्याला विशेष आनंद होत आहे,” असेही त्यांनी सांगितले.

शाळेचे प्राचार्य फादर सिमोन फर्नांडिस यांनी यावेळी दिवंगत निशा छाब्रिया यांचे आदराचे, प्रेरणेचे आणि कार्याचे स्मरण केले. त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा करत, “आज आयोजित केलेली ही फुटबॉल स्पर्धा केवळ एक स्पर्धा नसून, रेव्हरंड फादर एडी यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे,” असे मत मांडले. ते पुढे म्हणाले, “गेल्या ५० वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती वाढेल.”

या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणार असून, यामध्ये विविध शाळांचे संघ सहभागी झाले आहेत.

Tags: