Belagavi

रमेश कत्तींच्या जातीयवादी वक्तव्यांविरोधात वाल्मीकी समाज संतप्त

Share

वाल्मीकी समाजाला अवमानित करणारे वक्तव्य केल्याबद्दल रमेश कत्ती यांना अटक न केल्यास, येत्या २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण कर्नाटक बंद ठेवण्याचा इशारा वाल्मीकी समाजाने बेळगावमध्ये दिला आहे.

आज बेळगाव येथील राणी चन्नम्मा चौकात वाल्मीकी समाजाचे शेकडो लोक एकत्र आले. त्यांनी रमेश कत्ती यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या छायाचित्रांना चपलांनी मारून उग्र आंदोलन केले.

राजशेखर तळवार यांनी इशारा दिला की, “रमेश कत्ती यांनी वाल्मीकी समाजाला अपशब्दांनी हिणवले आहे. पोलिसांनी त्यांना २४ ऑक्टोबरपूर्वी अटक करावी. अन्यथा, बेळगावसह संपूर्ण कर्नाटक बंद ठेवून आम्ही मोठे आंदोलन करू,” असे त्यांनी म्हटले.

महेश शिगीहळ्ळी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, “वाल्मीकी समाजाचा अवमान करणाऱ्या रमेश कत्ती यांना योग्य धडा शिकवावा लागेल. वाल्मीकी समाज ब्रिटिशांच्या काळापासूनच अग्रस्थानी आहे. रमेश कत्ती यांचे वक्तव्य केवळ वाल्मीकी समाजापुरते नाही, तर सर्वच समाजाच्या असंतोषाला कारणीभूत ठरले आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

आणखी एका आंदोलकांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “जर आमच्या नेत्यांच्या वाटेला कोणी आले, तर ते योग्य होणार नाही. वाल्मीकी समाज आणि समाजाच्या नेत्यांविरुद्ध वारंवार वक्तव्य करणे, आपण जातीयवादी असल्याचे दर्शवते. पोलीस विभागाने रमेश कत्ती यांना हद्दपार करावे,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

कॅम्प पोलिस ठाण्यात जातीय अवमानाचा गुन्हा दाखल होऊन २० तास उलटले असतानाही बेळगाव पोलिसांनी कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. “संपूर्ण समाज या निष्क्रियतेचे योग्य उत्तर देईल. रमेश कत्ती यांना तुरुंगात डांबले पाहिजे,” असे यावेळी अनेकांनी ठणकावून सांगितले.

यावेळी वाल्मीकी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: