Hukkeri

‘वीर चन्नम्मा’ उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा; तहसीलदार कट्टीमनी

Share

येत्या २३ ऑक्टोबरपासून कित्तूर येथे होणाऱ्या कित्तूर उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हुक्केरीचे तहसीलदार बलराम कट्टीमनी यांनी केले.

२३ ऑक्टोबरपासून बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे कित्तूर उत्सव होणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने राज्यभर फिरत असलेला चन्नम्माचा ज्योत रथ आज सकाळी हुक्केरी शहरात पोहोचला. शहराच्या अडवी सिद्धेश्वर मठाच्या आवारात तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार बलराम कट्टीमनी आणि तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी टी. आर. मल्लाडद यांनी ज्योत रथाचे स्वागत करून पूजा केली.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना तहसीलदार म्हणाले की, “आज हुक्केरी शहरात आलेल्या कित्तूर ज्योतीचे तालुका प्रशासनाकडून भव्य स्वागत करण्यात आले असून, शहरात मिरवणूक काढून उद्या त्याची रवानगी केली जाईल. लोकांनी कित्तूर उत्सवात अधिकाधिक संख्येने भाग घेऊन तो यशस्वी करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

ज्योत वाहून नेणारा रथ कोर्ट सर्कलजवळ पोहोचला असताना, विविध विभागाचे अधिकारी, शालेय विद्यार्थी आणि कन्नड साहित्य परिषदेच्या सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून रथाला निरोप दिला.

गटशिक्षणाधिकारी प्रभावती पाटील यांनी सांगितले की, “बेळगाव जिल्ह्याच्या वीर वनिता कित्तूर चन्नम्माचा उत्सव सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून साजरा होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. आपण सर्वांनी चन्नम्माचे देशप्रेम आत्मसात केले पाहिजे.”

कार्यकारी अधिकारी मल्लाडद यांनी बोलताना, राज्याच्या जनतेला कित्तूर उत्सवाच्या शुभेच्छा,” दिल्या.

यावेळी क.सा.प. अध्यक्ष प्रकाश अवळक्की, नगरपरिषद मुख्याधिकारी ईश्वर सिद्धनाळ, सीडीपीओ होळेप्पा एच., समाज कल्याण सहायक संचालक गुरुशांत पावटे, अनुसूचित जमाती कल्याण अधिकारी महेश बजंत्री, शिवानंद गुंडाळे, ए. आय. कोटीवाले, ए. एस. पद्मन्नवर, आर. आय. सारपूरे, बसवराज नांदूडकर यांच्यासह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: