Belagavi

डीसीसी बँक निवडणुकीत जारकीहोळी बंधूंची निर्णायक बाजी

Share

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्याच दिवशी अत्यंत रोमांचक चित्र समोर आले आहे. आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या पॅनलचे तब्बल सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, आता केवळ त्यांची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

आपल्या नेत्यांविरोधात इतर कोणत्याही उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्यामुळे, विजयाची खात्री पटलेल्या समर्थकांनी आत्तापासूनच गुलाल उधळून आणि फटाके फोडून विजयाचा उत्सव साजरा केला आहे.

डीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी पूर्ण चित्रच बदलल्याचे दिसून येत आहे. आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या पॅनलमधून त्यांचे पुतणे अमरनाथ रमेश जारकीहोळी आणि राहुल सतीश जारकीहोळी, तसेच चन्नराज हट्टीहोळी, नीळकंठ कप्पलगुद्दी यांच्यासह एकूण १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी सहा तालुक्यांमध्ये जारकीहोळी पॅनलच्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर कोणीही अर्ज भरला नाही. याच पार्श्वभूमीवर बेळगावतून राहुल जारकीहोळी, गोकाकहून अमरनाथ जारकीहोळी, यरगट्टीतून विश्वास वैद्य, चिक्कोडीतून गणेश हुक्केरी, मुडलगितून नीळकंठ कप्पलगुद्दी आणि सवदत्तीमधून विरुपाक्ष मामनी यांची निवड बिनविरोध झाली आहे.

यावेळी आपले मत मांडताना विश्वास वैद्य म्हणाले, “यरगट्टीमध्ये आमच्याविरुद्ध कोणीही अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे हा माझा अधिकृत विजय आहे.” हा विजय आपण समस्त यर्गट्टी तालुक्यातील जनतेला समर्पित करत आहोत. तसेच, मंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या आशीर्वादामुळेच हा विजय प्राप्त झाला आहे. आता केवळ अधिकृत घोषणेची वाट पाहत आहोत, अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

याचवेळी नीळकंठ कप्पलगुद्दी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “भालचंद्र जारकीहोळी यांच्या पॅनलने मोठे बहुमत मिळवले असून, माझा हा तिसरा विजय आहे.” शेतकऱ्यांसाठी पीकेपीएस मार्फत शून्य व्याजदराने कर्ज, ट्रॅक्टरसह इतर सुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.

या बिनविरोध विजयाच्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवारांचे समर्थक आणि चाहते आत्तापासूनच गुलाल उधळून, फटाके फोडून आपला विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.

Tags: