Belagavi

बेळगावचा क्रिकेटपटू अमेय भातकांडे याचा इंग्लंडमधील स्पर्धेत अविस्मरणीय खेळ

Share

इंग्लंड येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निमंत्रितांच्या क्रिकेट महोत्सव २०२५ या टी-१० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगावचा सुपूत्र अष्टपैलू क्रिकेटपटू अमेय मिलिंद भातकांडे याने अविस्मरणीय खेळ करत भारत ब्रिस्टल संघाला पाकिस्तान ब्रिस्टलियन्स संघावर नेत्रदीपक विजय मिळवून दिला.

इंग्लंडमधील हिंटन चार्टर हाऊस क्रिकेट क्लब मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात अमेय मिलिंद भातकांडे याने झंझावाती फलंदाजी करताना ६ उत्तुंग षटकार आणि ३ चौकारांसह नाबाद ६५ धावांची खेळी केली. याचबरोबर, त्याने सर्वोत्तम गोलंदाजी करताना २ गडी बाद केले आणि ‘सामनावीर’ पुरस्कार पटकावला.

भारत ब्रिस्टल संघाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ३ गडी गमावून १०५ धावा काढल्या. यात अमेय भातकांडेने नाबाद ६५ आणि परीक्षित शेट्टीने ३० धावांचे योगदान दिले. उत्तरादाखल खेळताना पाकिस्तान ब्रिस्टलियन्स संघाने १० षटकांत ७ गडी गमावून ९० धावांपर्यंतच मजल मारली. त्यांच्याकडून शोएबने ३७ तर इम्रान खानने २२ धावा काढल्या. भारत ब्रिस्टल संघाकडून विनीतने ३, तर अमेय भातकांडेने २ बळी घेतले.

या स्पर्धेत भारत संघाने इंग्लंड हिंटन चार्टर हाऊस क्रिकेट क्लब आणि ब्रिस्टल बांगलादेशी संघांना एकतर्फी पराभूत करत अंतिम फेरीत पाकिस्तान ब्रिस्टलियन्स संघाला सहज हरवले. अमेय भातकांडे याला त्याचे वडील मिलिंद भातकांडे आणि आई मधुरा भातकांडे यांचे प्रोत्साहन, तसेच ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रवी शंकर मालशेट आणि रणजी क्रिकेटपटू मिलिंद चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Tags: