बेळगाव येथील जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीच्या बैठकीत खासदार जगदीश शेट्टर यांनी जाती सर्वेक्षणामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

खासदार जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली आज बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीची बैठक झाली. जाती सर्वेक्षणाचा कालावधी वाढवल्यामुळे मुलांच्या सुट्ट्या वाढल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची सूचना खासदार शेट्टर यांनी केली.

यावर शिक्षण विभागाच्या उपसंचालिका लीलावती हिरेमठ यांनी प्रतिक्रिया दिली. शासकीय सर्वेक्षण कामासाठी ९८ टक्के प्राथमिक शिक्षकांचा वापर करण्यात आला आहे, तर शहरी भागात केवळ माध्यमिक शिक्षकांना घेण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थ्यांसाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत विशेष वर्ग घेण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
यावर खासदारांनी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सर्वेक्षणात प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा मोठ्या संख्येने वापर न करता, अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांनाही समाविष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, बिम्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सध्या के.एल.ई. च्या डॉक्टरांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात आहे. या रुग्णालयासाठी कायमस्वरूपी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. डॉक्टरच नसतील तर रुग्णालय बांधून काय उपयोग, असा प्रश्न त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी गडाद यांना विचारला.
यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले की, या संदर्भात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यांनी टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.
या वेळी चिक्कोडी लोकसभेच्या सदस्य प्रियंका जारकीहोळी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments