Belagavi

अधिक अनुदानासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करणार: जिल्हाधिकारी

Share

बेळगाव येथे कन्नड राज्योत्सवासाठी अधिक अनुदान मिळावे म्हणून राज्य शासनाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. तसेच, उत्सवांमध्ये कानाचे पडदे फाडणाऱ्या डीजे संस्कृतीला लगाम घालण्याची प्रथा राज्योत्सवापासूनच सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला.

बेळगाव जिल्हा परिषद सभागृहात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक राज्योत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होणकेरी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

कन्नड समर्थक कार्यकर्ते अनंतकुमार बॅकोड यांनी राज्य शासनाकडून राज्योत्सवासाठी अधिक अनुदान मिळण्याच्या विषयावर आवाज उठवला. तसेच, ते म्हणाले की, “या बैठकीला मंत्री किंवा महापौर कोणीही आले नाहीत. गेल्या वर्षीही अनुदान मिळेल, असे सांगितले होते, पण बेळगावची मानहानी झाली. बेळगाववर अन्याय होत असताना कोणताही लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

यावर जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिले की, “जिल्हा पालक मंत्र्यांनी बैठक घेतली असताना अधिक अनुदानावर चर्चा झाली होती. यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला जाईल. शासनाकडून अनुदान नक्कीच येईल आणि त्याचा योग्य वापर केला पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, कन्नड समर्थक कार्यकर्ते श्रीनिवास ताळूकर यांनी बेळगावमधील सूचना आणि मार्गदर्शन करणाऱ्या फलकांवर ६० टक्के कन्नड भाषेचा वापर करण्याची मागणी मांडली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. या मागणीला महानगरपालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “राज्य उत्सवाच्या वेळेपासूनच पाश्चात्य डीजे संस्कृती थांबवून कन्नड भूमीच्या संस्कृतीनुसार पारंपारिक वाद्यांचा वापर करूया. हे धोरण राज्योत्सवात सुरु करून ते इतर सर्व प्रसंगांमध्येही वाढवूया.”

यावर काही संघटनांनी विरोध दर्शवला. त्यांच्या मते, “डीजेमुळेच बेळगावमध्ये राज्यउत्सवासाठी जास्त लोक येतात. त्यामुळे तो प्रतिबंधित करू नका,” असे त्यांचे म्हणणे होते. या आक्षेपाला दीपक गुडागनट्टी आणि सुरेश गवण्णवर यांनी विरोध करत, “बेळगावचा राज्योत्सव ऐतिहासिक आहे आणि त्याचा डीजेशी कोणताही संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले की, किती व्यासपीठांची आवश्यकता आहे, याची जबाबदारी तीन प्रमुख कार्यकर्त्यांनी घ्यावी आणि १० दिवसांच्या आत माहिती सादर करावी.

अन्य एक कन्नड कार्यकर्ते महादेव तळेवार यांनी गांधी भारताच्या धर्तीवर बेळगावच्या प्रमुख चौकांत दीपावलीप्रमाणे दीपालंकार करण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी याच धर्तीवर प्रमुख मार्ग आणि चौकांत सजावट करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी विविध कन्नड समर्थक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: