बेळगाव तालुक्यातील मच्छे गावातील रामनगर येथे पत्नीने आपल्या पतीच्या डोक्यावर उकळते तेल ओतून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची अमानुष घटना उघडकीस आली आहे.

रामनगर येथील रहिवासी वैशाली पाटील (वय ४८) या महिलेने हे क्रूर कृत्य केले असून, तिने आपला पती सुभाष पाटील (वय ५५) यांच्या डोक्यावर उकळते तेल ओतून ही विकृती दाखवली. सुभाष पाटील यांचे परस्त्रीशी अनैतिक संबंध असल्याचा वैशालीला संशय होता. याच संशयावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते, असे सांगितले जात आहे. गॅस सप्लायर म्हणून काम करणारे सुभाष, नेहमीप्रमाणे काम संपवून घरी आले असता पत्नी वैशालीने त्यांच्या डोक्यावर उकळते तेल ओतले.
उकळते तेल ओतल्यामुळे सुभाष पाटील यांच्या शरीराचा सुमारे ६० टक्के भाग भाजून ते गंभीर जखमी झाले आहेत. पत्नीच्या या क्रूरपणामुळे सुभाष सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. जखमी सुभाष यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ बीम्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अधिक उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला आहे. पत्नीच्या संशयातूनच हे कृत्य घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.


Recent Comments