
बेळगावमधील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी असलेले वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाचे बसस्थानक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात लोकर्पित करण्यात आले. बेळगाव स्मार्ट सिटी अनुदानातून हे बसस्थानक उभारण्यात आले आहे.

सुमारे २.१९ गुंठे जागेत ४९.८ कोटी रुपये खर्चून हे बसस्थानक बांधण्यात आले आहे. या बसस्थानकात एकूण २८ फलाट आहेत. हे एक अत्यंत हाय-टेक बसस्थानक असून, यात सरकते जिने, लिफ्ट, सुसज्ज व्यावसायिक संकुल, स्वच्छतागृहे, बेसमेंट, तीन मजले आणि विभागीय कार्यालये यांचा समावेश आहे.
फलाट क्रमांक १ वरून वडगाव आणि अनगोळकडे जाणाऱ्या शहर परिवहन बसेस, फलाट क्रमांक २ वरून उद्यमबाग, फलाट क्रमांक ३ वरून ए.पी.एम.सी., फलाट क्रमांक ४ वरून वंटमूरी, रामतीर्थनगर, कणबर्गी आणि फलाट क्रमांक ५ वरून सुवर्णसौधकडे जाणाऱ्या बसेस सुटतील, तर फलाट क्रमांक ६ वरून सुळेभावी, करडीगुद्दी आणि मारीहाळ जवळ जाणाऱ्या बसेस थांबतील.
विभागीय नियंत्रणाधिकारी के. एल. गुडन्नवर यांनी आवाहन केले की, या सुसज्ज ‘स्मार्ट बसस्थानका’ची स्वच्छता राखण्यासाठी आणि येथील अत्याधुनिक सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी आणि पर्यटकांनी सहकार्य करावे.
यावेळी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, मंत्री शरण प्रकाश पाटील, एम. सी. सुधाकर यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments