म्हैसूर येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये बेळगावच्या डीवायईएस क्रीडा ज्युदो केंद्राच्या ज्युदोपटूंनी अविस्मरणीय कामगिरी केली.

महिला विभागात ४ सुवर्ण, २ रजत आणि ३ कांस्यपदके जिंकून अजिंक्यपद करंडक (चॅम्पियन ट्रॉफी) आपल्या नावावर केला. बेळगावच्या या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर साधलेल्या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
दिनांक २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत म्हैसूर येथील महाराजा इनडोअर हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली. बेळगावच्या ज्युदोपटूंनी महिला विभागात एकूण ९ पदके जिंकून अभूतपूर्व यश संपादन केले आणि याच बळावर त्यांनी चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या खेळाडूंच्या यशामागे श्रीमती रोहिणी पाटील आणि कुतुजा मलतनी यांचे सूक्ष्म प्रशिक्षण आणि उपसंचालक श्री. श्रीनिवास बी. यांचे निरंतर प्रोत्साहन ही प्रमुख कारणे ठरली आहेत.
साहना बेळगळी (-५७ किलो), राधिका दुकरे (-७० किलो), सैश्वरी कोडचवड्लर (-७८ किलो) आणि भूमिका व्ही.एन. (+७८ किलो) यांनी सुवर्णपदकाची (गोल्ड) कमाई केली. तर, पार्वती अंबळी (-६३ किलो) आणि सौरभ पाटील (-८१ किलो) यांनी रजतपदक (सिल्व्हर) जिंकले. याशिवाय, दिलशान नदाफ (-६० किलो), अमृता नायक (-४८ किलो) आणि सौरभ भाविकट्टी (-६६ किलो) यांनी कांस्यपदक (ब्रॉन्झ) प्राप्त केले. ज्युदोपटूंच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


Recent Comments