हुक्केरी तालुक्यातील सारोपूर गावातील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरासाठी ५० लाख रुपये आणि बागेवाडी येथील आदिनाथ वस्ती मंदिराच्या समितीसाठी ४० लाख रुपयांचा निधी सरकारकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती बेळगावचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

गोकाक शहरातील हिल गार्डन कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, हुक्केरी तालुक्यातील जैन समाजाच्या नेत्यांनी अनेक गावांमध्ये समाजमंदिर बांधण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यामुळे हुक्केरी तालुक्यातील दोन गावांमध्ये समाजमंदिराच्या बांधकामासाठी निधी जाहीर करण्यात आला आहे. आज दुपारी चार वाजता हुक्केरी येथील विश्रामगृहात या निधी मंजुरीचे आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय, हुक्केरी तालुक्यातील २३ गावांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १ कोटी रुपये खर्चून हाय-मास्ट दिवे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित गावांच्या प्रमुखांनी हे आदेश घेण्यासाठी हुक्केरी विश्रामगृहात उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्र्यांनी केले आहे.
हुक्केरी तालुक्यातील शिरपूर, इटणी, करजगी, हंजाणट्टी, यादगूड, शिरहट्टी, शिरहट्टी केडी, बेळवी, सैलापूर, अमिनाभावी, कमतनूर, निडसोशी, अंकली, बोरगल, चेस्ती, आलूर केएम, अक्कीवाट, हंदीगुर, निडसोशी वाडी, अम्मनगी आणि हुक्केरी शहरासाठी तीन हाय-मास्ट दिवे मंजूर करण्यात आले आहेत.
याचबरोबर, हुक्केरी तालुक्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मुस्लिम समाजालाही मंत्र्यांनी मोठी भेट दिली आहे. हुक्केरी तालुक्यातील हरगापूर, हडलगा, के.एस. नागानूर, शिरपूर या गावांमध्ये वाल्मीकी भवन बांधण्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. तसेच, तालुक्यातील १७ गावांमध्ये प्रत्येकी २० लाख रुपये खर्चून डॉ. बी.आर. आंबेडकर भवन आणि बाबू जगजीवन राम भवन बांधण्यासाठी निधी मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली. अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये सिमेंट-काँक्रिटचे रस्ते बांधण्यासाठीही निधी जाहीर करण्यात आला आहे.


Recent Comments