बेळगावात नवरात्रीनिमित्त आयोजित श्री दुर्गामाता दौडीच्या तिसऱ्या दिवशी मुस्लिम बांधवांनी या दौडीचे उत्साहात स्वागत करून सामाजिक सलोख्याचा एक अनोखा संदेश दिला आहे.

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीच्या पूजनाने श्री दुर्गामाता दौडला सुरुवात झाली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरू झालेली ही दौड काँग्रेस रोड, ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडेंट रोड, हाय स्ट्रीट, वेस्ट स्ट्रीट, कंदप्पा स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंतीमाता मंदिर, फिश मार्केट, तेलगू कॉलनी, के.टी. पुजारी श्री दुर्गामाता मंदिर, आणि खानापूर रोड या मार्गावरून पुढे गेली. यावेळी कॅम्प परिसरातील मुस्लिम बांधवांनी श्री दुर्गामाता दौडीचे भव्य स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना एमएलआयआरसीचे अधिकारी आणि कँटोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य साजिद शेख यांनी, मुस्लिम बांधवांनी केलेल्या या भव्य स्वागताचे कौतुक केले. “श्री दुर्गामाता दौडीचे मुस्लिम बांधवांनी केलेले स्वागत हे देशासाठी सलोख्याचा संदेश आहे. पहिल्यांदाच या दौडीमध्ये सहभागी झाल्याचा आनंद होत आहे,” असे त्यांनी सांगितले.
साजिद शेख यांनी पुढे सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कॅम्पमध्ये मुस्लिम बांधव, जंगी कुटुंबीय आणि आमच्या गल्लीच्या वतीने दुर्गामाता दौडीचे स्वागत करण्यात आले आहे. म्हैसूरप्रमाणेच बेळगावच्या कँटोन्मेंट परिसरातही दसरा मोठ्या उत्साहात साजरा होतो. आई दुर्गेने सर्वांचे कष्ट दूर करून सुख-शांती द्यावी,” अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यानंतर, खानापूर रोड मार्गे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून जत्ती मठात पोहोचून या दौडीची सांगता झाली.


Recent Comments