


नवरात्रीच्या धार्मिक उत्सवाचे बेळगावातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असलेली श्री दुर्गामाता दौड आजपासून सुरू झाली आहे. देव, देश आणि धर्माची जागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या दौडला बेळगावकरांकडून पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, शैलपुत्री देवीच्या पूजनाने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बेळगावात श्री दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मार्गावरील उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला छत्रे गुरुजींसह इतर मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर प्रेरणा मंत्राने ध्वजारोहण करून दौडला सुरुवात झाली. ही दौड हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एस.पी.एम. रोड, संतसेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्री नगर, गुड्सशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर आठले रोड, महाद्वार रोड क्रॉस नं. ४, माणिकबाग रोड, समर्थ नगर, तानाजी गल्ली, महाद्वार रोड क्रॉस नं. ३ आणि क्रॉस नं. २ मार्गे छत्रपती संभाजी गल्लीतून पुन्हा एस.पी.एम. रोडवर परतली.
यावेळी हिंदू परंपरेनुसार वेशभूषा केलेल्या युवतींनी दौडमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. दौड आपल्या गल्लीत येताच गावकऱ्यांनी औक्षण करून तिचे भक्तीभावाने स्वागत केले. रात्रीपासूनच दौडच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तसेच भगव्या पताका आणि तोरणांनी रस्ते सजवण्यात आले होते. दौडमध्ये श्री दुर्गा भवानी आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील चित्ररथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
या दौडीबद्दल ‘इन न्यूज’ला अधिक माहिती देताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख किरण गावडे म्हणाले, ‘आजपासून बेळगाव आणि परिसरात श्री दुर्गामाता दौड सुरू झाली आहे. या वर्षी दौडचे २७वे वर्ष आहे. दरवर्षी धारकऱ्यांची संख्या वाढत आहे. जगभरात सुख-समृद्धी नांदावी आणि देव, देश, धर्म अखंड राहावा या उद्देशाने ही दौड आयोजित केली जाते.’ असे त्यांनी म्हटले.
दौडचा समारोप दक्षिण काशी कपिलेश्वर येथे झाला. एसीपी कट्टिमनी, एसीपी शेखरप्पा यांच्यासह अनेक मान्यवरांनी महाआरती केली आणि ध्येयमंत्रासह ध्वजारोहण करून पहिल्या दिवसाची दौड पूर्ण झाली. या दौडमध्ये युवक-युवतींनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. मंगळवारी राणी चन्नम्मा सर्कल येथून दौडला सुरुवात होऊन ती किल्ले दुर्गादेवी मंदिरापाशी समाप्त होईल.


Recent Comments