Belagavi

बेळगावात सफाई कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा

Share

बेळगाव शहर स्वच्छ ठेवण्याचे श्रेय सफाई कर्मचाऱ्यांना सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले असेल, तर संपूर्ण बेळगाव शहर निरोगी राहील, असे मत महापौर मंगेश पवार यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना व्यक्त केले.

सफाई कर्मचारी दिनानिमित्त बेळगाव महानगरपालिकेने आयोजित केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेला कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

बेळगावात सफाई कर्मचारी दिनानिमित्त बेळगाव महानगरपालिकेने शनिवारी जिल्हा पोलीस क्रीडांगणावर सफाई कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी पक्षाचे नेते आणि नगरसेवक यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योत पेटवून या स्पर्धांना सुरुवात झाली.

याप्रसंगी बोलताना महापौर मंगेश पवार म्हणाले की, “रोज बेळगाव शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता दर्शवण्यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आयुष्यात आरोग्याला सर्वाधिक महत्त्व आहे. आपले आरोग्य जपूनच काम केले पाहिजे. सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी असल्यास, संपूर्ण बेळगाव शहर निरोगी राहील.”

उपमहापौर वाणी जोशी म्हणाल्या की, “शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कष्ट करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा नेहमीच कौतुकास्पद आहे. सफाई कर्मचारी दिनानिमित्त आज या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.”

सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांनी सफाई कर्मचारी दिनाचे महत्त्व सांगितले. याच वेळी त्यांनी बंगळूरू येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सेवा सन्मान स्वीकारलेले इंडियन एक्सप्रेसचे ज्येष्ठ पत्रकार नौशाद बिजापूरे यांचेही अभिनंदन केले.

यानंतर विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले, ज्याला सफाई कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला विविध स्थायी समितीचे अध्यक्ष, नगरसेवक, सफाई कर्मचारी, पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी , नगरसेविका वीणा विजापूरे, बेळगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास जोशी, श्रीशैल मठद यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Tags: