कल्याण कर्नाटकसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्याप्रमाणेच कित्तूर कर्नाटकसाठीही स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, अशी मागणी उत्तर कर्नाटक विकास वेदिकेचे अध्यक्ष अशोक पुजारी यांनी केली.

शुक्रवारी बेळगावमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यापासून उत्तर कर्नाटकाचा विकास झाला नाही. गेल्या १५ वर्षांपासून या भागाच्या विकासासाठी संघर्ष सुरू आहे. मात्र, कोणत्याही मुख्यमंत्र्याने उत्तर कर्नाटकाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही.
सुवर्ण विधानसौध बांधून दीड दशक झाले तरी, अजूनही बेंगळुरू येथील सचिव स्तरावरील कार्यालये इथे हलवण्यात आली नाहीत, ज्यामुळे उत्तर कर्नाटकाच्या विकासाला गती मिळेल. यासाठी आपल्या भागातील मंत्री आणि आमदारांनीही आवाज उठवला नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने कल्याण कर्नाटकाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र, कित्तूर कर्नाटकातील सुवर्ण विधानसौधमध्ये सचिव स्तरावरील कार्यालये त्वरित हलवण्यात यावीत, अशी मागणीही त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला विरूपाक्षय्या नीरलगिमठ, एम.व्ही. हिरेमठ यांच्यासह अन्य उपस्थित होते.


Recent Comments