Belagavi

केएमएफ वार्षिक सभेत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

Share

दुग्ध उत्पादक शेतकरी मरण पावल्यास त्यांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. जिल्ह्यातील ३५,००० हून अधिक शेतकऱ्यांसाठी ही विमा योजना लागू करण्यात येत असल्याची माहिती केएमएफचे संचालक भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली.

बेळगाव दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भालचंद्र जारकीहोळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “गेल्या वर्षी संघाला १३ कोटी रुपयांचा नफा झाला होता, त्यापैकी १० कोटी रुपये सभासदांना परत करण्यात आले. राज्यात ६० टक्के अनुदान देऊन विविध योजना राबवण्यात येत आहेत. मागील वर्षी ४०० कोटींची उलाढाल झाली होती, तर पुढील वर्षी ५०० कोटींपेक्षा जास्त नफा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. म्हशीच्या दुधालाही चांगला भाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ३५,००० दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विमा उतरवण्यात आला असून, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपयांची मदत मिळेल,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “अमूलला गुजरात सरकारचा पाठिंबा आहे, पण तरीही आमची नंदिनी ब्रँड प्रगतीपथावर आहे. बेळगाव जिल्ह्यात आमच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. आम्ही इतर दुग्धजन्य पदार्थही तयार करण्यावर भर देत आहोत. तसेच प्रत्येक तालुक्यातून तीन सोसायट्या आणि महिला बचत गटांची निवड करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे,” असे त्यांनी सांगितले.

Tags: