विजापूर शहराचे आमदार बसवनगौडा यत्नाळ यांनी मैसूर येथील दसरा महोत्सवाच्या उद्घाटनाबद्दल बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यातील दलित महिलांचा अपमान झाला आहे, असा आरोप करत विजापूरमधील दलित नेत्यांनी त्यांच्या तातडीने अटकेची मागणी केली आहे.

या प्रकरणी विजापूर शहर काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभाग आणि जलनगर ब्लॉक यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना दलित नेत्यांनी यत्नाळ यांच्यावर सडकून टीका केली. सार्वजनिक ठिकाणी दलित महिलांविषयी असे निम्न पातळीचे वक्तव्य करून त्यांनी समाजाचा अपमान केला आहे. यत्नाळ यांची मानसिकता गलिच्छ असून, त्यांनी समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत यत्नाळ यांचा निषेध केला. या आंदोलनात महानगरपालिकेच्या सदस्या आरती शहापूर आणि परशुराम होसमनी यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.


Recent Comments