हुक्केरी विद्युत सहकारी संस्थेच्या निवडणुकीत महावीर उद्योग समूहाचे अध्यक्ष महावीर निलजगी हे रमेश कत्ती आणि ए. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वाभिमान पॅनेल’मधून उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.

हुक्केरी शहरात आमदार निखिल कत्ती आणि तरुण नेते विनय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हुक्केरी विद्युत सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील अडवी सिद्धगद्देश्वर मठ आणि ईश्वर लिंग मंदिरासह विविध भागांमध्ये नेत्यांनी मतदारांना आवाहन केले. यावेळी स्थानिक नेत्यांनी हुक्केरी शहरातून महावीर निलजगी यांना तिकीट देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे.

सभेत बोलताना आमदार निखिल कत्ती म्हणाले की, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले हे ‘हिरा साखर कारखाना सहाशे कोटींच्या कर्जात आहे,’ असे सांगत हिशोब मागत आहेत. परंतु, गेल्या पाच वर्षांत निपाणी येथील हालसिद्धनाथ साखर कारखाना अकराशे कोटी रुपयांच्या कर्जात आहे. याचा हिशोब कोण देणार? ‘घटप्रभा शुगरचा हिशोब कोण देणार,’ असा सवाल त्यांनी बाळचंद्र जारकीहोळी यांना विचारला.
तरुण नेते विनय पाटील यांनी सांगितले की, ‘विद्युत सहकारी संस्थेच्या निवडणुकीत जातीय राजकारण न करता, सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन नेत्यांनी ठरवलेल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सहकार्य करावे. विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, मतदान करून त्यांना योग्य उत्तर द्यावे लागेल,’ असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर महावीर निलजगी, बसवराज पाटील, अप्पुसी तुबची, राजू मुन्नोळी, रवी जुटाळे, ए. के. पाटील, सुहास नूळी, रेखा चिक्कोडी, रुक्मिणी हळिजोळ, उदय हुक्केरी, श्रीशैल सांबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments