एपीएमसी संचालकांनी परवानगी रद्द केलेल्या बेळगावमधील ‘जय किसान’ या खासगी भाजी मार्केटला जिल्हा प्रशासनाने तातडीने सील करावे, या मागणीसाठी शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर खासगी मार्केट ‘जय किसान’ला तातडीने सील करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
बेळगावमधील सरकारी एपीएमसी वाचवण्यासाठी सर्व शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी सरकारचे डोळे उघडले आहेत. कृषी विभागाच्या बाजारपेठ संचालकांनी बेळगावमध्ये सुरू असलेल्या ‘जय किसान’ या खासगी मार्केटची परवानगी रद्द केली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांनी ‘जय किसान’ या बेकायदेशीर भाजी मार्केटला तातडीने सील करून ताब्यात घ्यावे आणि शेतकऱ्यांच्या भाज्या एपीएमसीकडे पाठवाव्या. ‘जय किसान’ खासगी भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांना आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळत नव्हती. आता बाजारपेठ एपीएमसीकडे हस्तांतरित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या समस्या व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. जर या बेकायदेशीर ‘जय किसान’ खासगी भाजी मार्केटला तातडीने सील केले नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भारतीय कृषिक समाजाचे नेते सिद्धगौडा मोदगी यांनी दिला.
यावेळी शेतकरी संघटनेचे प्रमुख चूनप्पा पुजारी, सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, वकील नितीन बोळबंदि यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments