Dharwad

कृषी विद्यापीठांनी संशोधनाचा वेग वाढवावा – मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

कृषी क्रांतीच्या वेगाने अन्न उत्पादन होत नाहीये. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी यावर अधिक संशोधन करून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन धारवाड येथील कृषी मेळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे.

धारवाड कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या कृषी मेळ्याचे उद्घाटन आणि ‘उत्कृष्ट शेतकरी’ आणि ‘उत्कृष्ट कृषी महिला’ पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या सुरुवातीला आपण अन्न उत्पादनात मागे होतो. नंतर अन्न उत्पादनात स्वावलंबी झालो आणि निर्यातही करू लागलो. मात्र, अलीकडे जमिनीचा कस कमी झाल्याने अन्न उत्पादन घटले आहे. कृषी विद्यापीठांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात अन्न उत्पादन होत नाहीये. हा केवळ कृषी मेळा नसून, शेतकऱ्यांचा मेळा आहे. कृषी विद्यापीठांनी यावरची योग्य कारणे शोधून त्यावर तोडगा काढण्यासाठी अधिक संशोधन करावे. यासाठी आवश्यक ती सर्व आर्थिक मदत देण्यास सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आमच्या सरकारने कृषी क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना कर्ज, खत, बियाणे, कृषी अवजारे आणि नवीन जातींच्या संशोधनासाठी सहकार्य करत आहे. कर्नाटक दूध उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दररोज एक कोटी लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. लवकरच आपण गुजरातला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. यात काहीच शंका नाही. आपण दुग्धव्यवसायात प्रचंड प्रगती केली आहे.” कृषी विद्यापीठांनी ‘लॅब टू लँड’ सोबतच ‘लँड टू लॅब’कडेही लक्ष द्यावे. कमी पावसातही चांगले पीक येईल अशा शाश्वत शेतीसाठी पूरक संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी कृषी विद्यापीठांना केले.

Tags: