Belagavi

एस. निजलिंगप्पा साखर संस्थेत अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा

Share

बेळगाव मधील एस. निजलिंगप्पा साखर संस्थेमध्ये ऊस उत्पादन वाढवण्यासंबंधित एका दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील विविध साखर कारखान्यांच्या ऊस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात मातीचे आरोग्य आणि ऊस व्यवस्थापनावर तज्ञांनी मार्गदर्शन केले.

या चर्चासत्रात कृषी विभागाचे सहसंचालक एच. डी. कोळेकर म्हणाले की, “अलिकडच्या काळात शेतीत जमिनीच्या सुपीकतेकडे दुर्लक्ष करून फक्त रासायनिक खतांचा आणि पाण्याचा जास्त वापर केला जात आहे. यामुळे जमिनीचा मूळ स्वभाव बिघडत चालला आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन कमी होत असून जमिनी खारट आणि पाणथळ होत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांनी शेतीसोबत दुग्धव्यवसायासारखे पूरक व्यवसाय सुरू करावेत आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहील आणि आरोग्यदायी शेतीला प्रोत्साहन मिळेल.”

एस. निजलिंगप्पा साखर संस्था, ऊस विकास आणि साखर संचालनालय आणि तामिळनाडूच्या मुरुगप्पा वॉटर टेक्नॉलॉजी अँड सोल्युशन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. निजलिंगप्पा साखर संस्थेचे संचालक राजगोपाल होते. यावेळी चेतना पाटील, जयतीर्थ नाडीगेर, डॉ. एस. एस. नूली, डॉ. व्ही. जी. येडहल्ली, रमेश धनवाडे, पौलुमी, साखर संस्थेचे आर. बी. सुतगुंडी, डॉ. संतोषकुमार पुजेरी आणि सचिनकुमार घटकांबळे यांच्यासह राज्यातील ११० हून अधिक ऊस विकास अधिकारी उपस्थित होते.

Tags: