Belagavi

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी

Share

अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि घरांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी आणि उत्तर व दक्षिण कर्नाटकात केला जाणारा भेदभाव थांबवावा, या मागणीसाठी भारतीय कृषक समाज, उत्तर कर्नाटक संघर्ष समिती आणि अहिन्द संघटनांनी बेळगावात आंदोलन केले.

भारतीय कृषक समाज, उत्तर कर्नाटक संघर्ष समिती आणि अहिन्द संघटनेने एकत्र येऊन आज बेळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.

यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते भीमप्पा गडाद म्हणाले की, “सरकार वारंवार उत्तर कर्नाटकाकडे दुर्लक्ष करत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी पिकवलेले मूग, उडीद आणि सोयाबीनचे पीक खराब झाले आहे, पण त्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. तसेच, घर गमावलेल्या लोकांना दक्षिण कर्नाटकात एक प्रकारची आणि उत्तर कर्नाटकात दुसऱ्या प्रकारची भरपाई दिली जात आहे. हा भेदभाव संपवला नाही, तर भविष्यात स्वतंत्र उत्तर कर्नाटकासाठी आंदोलन करावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, एका महिला आंदोलक म्हणाल्या की, “राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांनी तात्काळ मदत जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी अदिवेश इटगी, श्रीकांत भरमन्नवर, महांतेश शेल्लीकेरी, महेश पाटील, महांतेश मत्तीकोप्पा, प्रमोद पुजारी, गंगामा कुरबर, शैला तिप्पणगोल यांच्यासह अनेकजण आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: