Belagavi

डीसीसी बँक निवडणुकीत ६ संचालकांचे ‘हायजॅक’

Share

सध्या बेळगावच्या राजकारणात डिसिसी बँक निवडणूक प्रतिष्ठेची लढाई बनली असून, पीकेपीएस संचालकांना ‘हायजॅक’ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माजी खासदार रमेश कत्ती यांच्या कारखान्याच्या गेस्ट हाऊसमधून ६ पीकेपीएस संचालकांना यमकनमर्डी पोलिसांनी बाहेर काढले.

सध्या डिसिसी बँक निवडणुकीत मंत्री सतीश जारकीहोळी, ए. बी. पाटील आणि माजी खासदार रमेश कत्ती यांच्यात मोठी चुरस सुरू आहे. हुक्केरी तालुक्यातील पाश्चापूर गावातील पीकेपीएस संचालक अल्लप्पा हिरेकोडी, दुदप्पा शिंत्रे, रफीक मदिहल्ली, विलास अन्वेकर, शिवलीला वस्त्रद आणि श्रीशैल पट्टणशेट्टी यांना कत्ती यांच्या कारखान्यात जबरदस्तीने ठेवल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. या तक्रारीनंतर यमकनमर्डी पोलिस ठाण्याचे सीपीआय जाविद मुशापुरे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने तात्काळ कत्ती यांच्या मालकीच्या बागेवाडीजवळील विश्वराज शुगर्स कारखान्याच्या गेस्ट हाऊसला भेट दिली.

यावेळी रमेश कत्ती तेथे उपस्थित होते. याबद्दल विचारले असता त्यांनी म्हटले, “हो, सहाही संचालक येथेच आहेत. ते त्यांच्या इच्छेने येथे आले आहेत, त्यांना जबरदस्तीने आणलेले नाही. तुम्ही त्यांना असे का घेऊन जात आहात?” असे त्यांनी पोलिसांना विचारले. यावर सीपीआय जाविद मुशापुरे यांनी, “तसे असेल तर त्यांना बोलवा. आम्ही त्यांचे जबाब नोंदवून घेऊ. जर ते स्वेच्छेने आले असतील तर स्टेटमेंट देऊन इथेच थांबू शकतात,” असे सांगितले. याच दरम्यान रात्री उशिरा पोलिस आणि रमेश कत्ती यांच्यात मोठा ‘हायड्रामा’ सुरू झाला. त्यानंतर रमेश कत्ती यांनी आधी संचालकांशी चर्चा केली आणि नंतर पोलिसांना, “जर ते तुमच्यासोबत यायला तयार असतील, तर त्यांना घेऊन जा,” असे सांगितले.

शेवटी पोलिसांनी सर्व संचालकांना पोलिस ठाण्यात आणले आणि त्यांना कत्ती यांच्या कारखान्यात बंदिस्त करून ठेवल्याच्या आरोपांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले. सध्या या ‘हायजॅक ड्रामा’मुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.

Tags: