Vijayapura

प्रियकराच्या मदतीने पत्नीने रचला पतीच्या खुनाचा कट

Share

विजापूर येथील एका घटनेत एका पत्नीनेच आपल्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला संपवण्याचा कट रचला होता. नशिबाने पतीचा जीव वाचला, मात्र आता पत्नीला अटक करण्यात आली असून, तिचा प्रियकर फरार आहे.

रुग्णालयात उपचार घेत असलेले बिरप्पा पुजारी हे मूळचे विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील अंजुटागी गावचे आहेत. १२ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह सख्ख्या मावशीच्या मुलीशी झाला होता आणि त्यांना दोन मुले आहेत. गेल्या १२ वर्षांपासून आनंदी असलेल्या त्यांच्या कुटुंबात, पत्नीनेच त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंडी शहरातील अक्कमाहादेवी नगरमधील त्यांच्या भाड्याच्या घरात १ तारखेला ही घटना घडली, ज्यात बिरप्पाचा जीव वाचला. पत्नीच्या प्रियकराने, सिद्दप्पा ख्यातनकेरी, याने बनवलेल्या एका व्हिडिओमुळे तिचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.

पत्नी सुनंदा हिच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर बिरप्पा पुजारीने आपले शेत विकून इंडी शहरात स्थलांतर केले होते. त्याने प्रियकर सिद्दप्पा ख्यातनकेरी याला पत्नीपासून दूर राहण्याची ताकीदही दिली होती, पण तिने हे मान्य केले नाही. १ तारखेला बिरप्पा झोपलेला असताना त्याच्यावर दोघांनी हल्ला केला. त्यावेळी त्याने पत्नीला ‘सिद्दप्पा, त्याला लवकर संपवून टाक,’ असे ओरडताना ऐकले. बिरप्पाने प्रतिकार केला असता त्याच्या पायाने कुलरला धक्का लागून मोठा आवाज झाला. घरमालक आणि मुलाने दरवाजा उघडल्यानंतर दोन्ही हल्लेखोर त्याला ‘आज वाचलास पण तुला नंतर सोडणार नाही,’ अशी धमकी देऊन पळून गेले. यानंतर बिरप्पाने तात्काळ इंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या घटनेनंतर सुनंदा हिने ‘आपला याच्याशी काही संबंध नाही,’ असा बनाव केला होता. मात्र, तिच्या प्रियकराने व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर तीला पोलिसांनि ताब्यात घेतले आहे. फरार असलेला सिद्दप्पा याला पकडण्यासाठी विजापूर पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्या नेतृत्वाखाली इंडी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. पतीला मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली सुनंदाला तुरुंगात पाठवण्यात आले असून, जखमी बिरप्पा एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

एका विवाहबाह्य संबंधांमुळे सुखी कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला असून, पत्नीच्या या कृत्यामुळे दोन निष्पाप मुलांचे भविष्यही धोक्यात आले आहे. पतीला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनंदाला आता तुरुंगात जावे लागले असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे. पुढील तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: