राजकीय पक्षांनी समाजात जातीयवाद निर्माण केला असून, लोकांना त्यात सहभागी होण्यासाठी वातावरण तयार केले आहे, असे मत नीडगुंदि मठाचे वीरभद्र चन्नमल्लिकार्जुन महास्वामीजी यांनी व्यक्त केले. वीरशैव-लिंगायत वाद मिटवण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

विजापूर शहरात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वीरशैव-लिंगायत वाद आजकालचा नाही, तर शतकानुशतके सुरू आहे. ही समस्या ८०च्या दशकात पुन्हा उदभवली आहे. हा वाद इतका दीर्घकाळ चालता कामा नये. शहरी आणि सुशिक्षित लोक वेगळे होण्याची भाषा करत असले, तरी बहुतांश वीरशैव आणि लिंगायत लोकांना एकत्र राहायचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या जनगणना प्रक्रियेआधी अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभेने मतदान घेऊन या समस्येवर प्रामाणिक आणि निष्पक्ष तोडगा काढावा, बसवण्णांचे सामाजिक आणि धार्मिक आदर्श राजकारणासाठी वापरले जात आहेत, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे, असे त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी म्हैसूरच्या दसऱ्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. दसरा हा कर्नाटकचा उत्सव आहे. कन्नड भूमीसाठी आणि भाषेसाठी ज्यांनी योगदान दिले आहे, मग ते हिंदू, मुस्लिम, जैन किंवा बौद्ध असोत, त्यांचे स्वागत केले पाहिजे, विरोध केला नाही पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण करू नये. जातीयवाद देशासाठी घातक आहे, असे त्यांनी म्हटले.
यावेळी एस.एस.पाटील, सरचिटणीस आर.एस.पाटील आणि सह-सरचिटणीस प्रभू बेळी उपस्थित होते.


Recent Comments