गणेश विसर्जनाच्या वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी घडली.

गेल्या ११ दिवसांपासून भक्तीभावाने बसवलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी बेळगाव जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडली आहे. खानापूर तालुक्यातील यडोगा गावात घरगुती गणपती विसर्जन करून परत येत असताना २२ वर्षीय शुभम कुप्पटगेरी नावाचा तरुण पाय घसरून मलप्रभा नदीत वाहून गेला. स्थानिकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे. एनडीआरएफचे पथक त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणी खानापूर तालुक्यातील नंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, बेळगाव शहरातील जक्केरी तलावात गणपती विसर्जनावेळी ३३ वर्षीय राहुल बेकवाडकर नावाचा तरुण पाण्यात पडला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला, मात्र बीम्स रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बेळगावातील टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments