पौराणीक इतिहासात उल्लेख असलेले आणि कपिलमुनींनी तपश्चर्या केलेल्या दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले बेळगावातील कपिलेश्वर मंदिर चंद्रग्रहणामुळे पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. ग्रहणाचे वेध लागल्यापासून ग्रहण संपेपर्यंत मंदिर बंद राहील.

कपिलमुनींनी तपश्चर्या केलेले, भाविकांचे कैलास म्हणून ओळखले जाणारे आणि हर आणि हरी एकमेकांसमोर असलेले देशातील एकमेव मंदिर, अशी ख्याती असलेल्या बेळगावातील कपिलेश्वर मंदिराचे दरवाजे रविवारी चंद्रग्रहण सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. मंदिरातील शिवलिंग वेदांचे पठण करून बेलपत्राने झाकण्यात आले आहे. ग्रहण संपल्यानंतर पंचगव्य घालून मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल. त्यानंतर अभिषेक, महामंगला आरती केली जाईल. नंतर बेलपत्र काढून विशेष पूजा केली जाईल आणि त्यानंतर मंदिरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले जाईल. उत्तर काशीप्रमाणेच कपिलेश्वर मंदिरालाही महत्त्व आहे. कपिलमुनींच्या तपश्चर्येमुळे येथे शिवलिंग प्रकट झाले होते आणि तेव्हापासून आजपर्यंत उत्तर भारतासह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात, असे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.


Recent Comments