Belagavi

बेळगावात शिवसेनेच्या ‘सुंदर गणेश मूर्ती’ स्पर्धेचा निकाल जाहीर

Share

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या बेळगाव शाखेने आयोजित केलेल्या ‘सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा २०२५’ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी प्रथमच ‘सामूहिक महाविजेता’ पुरस्कार देण्यात आला असून, हा पुरस्कार वडगावमधील अष्टविनायक नगरच्या ‘सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळा’ला मिळाला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण वडगाव येथे मोठ्या थाटामाटात पार पडले.

स्पर्धेत दोन विभागांमधून विजेते निवडण्यात आले आहेत. बेळगाव दक्षिण विभागामध्ये, श्री राम युवक मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला, तर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, रघुनाथ पेठ, अनगोळ द्वितीय आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, धारवाड रोड, संभाजी रोड, जोशीमळा, पाटील गल्ली, ओमनगर, खासबाग, बेळगाव तृतीय क्रमांकावर राहिले. ओंकार तरुण मित्र मंडळ, पवार गल्ली आणि भरत युवक मंडळ, जोशी गल्ली, शहापूर यांनी अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवला.

बेळगाव उत्तर विभागामध्ये, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, ध. संभाजी गल्ली, महाद्वार रोड यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. शिवशाही युवक मंडळ, श्री छत्रपती शिवाजी नगर गल्ली नं. ५, ६, ७ द्वितीय क्रमांकावर, तर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, श्री छत्रपती शिवाजी नगर तृतीय क्रमांकावर राहिले. धर्मवीर संभाजी युवक मंडळ, ताशिलदार गल्ली, बेळगाव आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, बेळगाव यांनी अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला.

या कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि तालुकाप्रमुख सचिन गोरले यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी उपशहरप्रमुख प्रवीण तेजम, राजू तुडयेकर, प्रदीप सुतार, मयुरेश काकतकर, अमर कडगावकर, महिपाल ईतापाचे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: