बेळगावमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी पोलिसांनी घातलेल्या नवीन अटी आणि शर्तींवर गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना आपण पोलीस आयुक्तांसमोर मांडल्या आहेत, असे बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.

बुधवारी बेळगावच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आमदार अभय पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “याआधी अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत अनेक नवीन अटी घालण्यात आल्या आहेत. बेळगावमध्ये अशा नवीन अटींची गरज नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, “४० गणेशोत्सव मंडळांचे मार्ग बदलणे, फटाके फोडू नका आणि फटाके फोडल्यास गुन्हा दाखल करू, डीजे सिस्टम या बँक ऑफ इंडियापर्यंत आणून तिथून पुढे पायी जावे अशा अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच, बैठकीनंतर काही पोलीस ठाण्यांनी ‘कोणतीही घटना घडल्यास तुम्ही जबाबदार असाल,’ असे सांगत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून रिकाम्या बॉण्ड पेपरवर सह्या घेतल्या.”
“या अटी तुम्हाला मान्य असतील तरच तुम्ही त्या पाळा आणि ज्यांना मान्य नसतील त्यांनी मला कळवा असे मी त्यांना सांगितले होते. त्यानुसार मी आज आयुक्तांची भेट घेतली. त्यांच्यासमोर मी गणेशोत्सव मंडळांची बाजू मांडली आहे. मिरवणुकीचा मार्ग बदलण्यासाठी मंडळांवर दबाव आणू नये. मिरवणूक त्यांच्या पारंपरिक मार्गावरूनच निघाली पाहिजे. ज्यांना मार्ग बदलायचा असेल, त्यांनी तो त्यांच्या इच्छेनुसार बदलावा. फटाके फोडण्यावर बंदी घालू नये. विसर्जन स्थळापर्यंत वाद्य घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली आहे,” असे आमदार पाटील म्हणाले. यावर आयुक्तांनी “आम्ही एकदा गणेश मंडळांना समजावून सांगू, त्यानंतर त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल,” असे आश्वासन दिल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.


Recent Comments