‘गुरुभक्ती, धार्मिक आचरण, संस्कृती, परंपरा आणि साधू-संतांमुळे आपली भूमी अत्यंत पवित्र झाली आहे. अशा पवित्र भूमीवर जगणे हे आपले भाग्य आहे,’ असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले.तारीहाळ गावातील श्री अडवी सिद्धेश्वर मठात शनिवारी संध्याकाळी आयोजित ‘तारीहाळ उत्सव २०२५’ च्या मौन अनुष्ठान सोहळ्यात त्या बोलत होत्या. श्रावण महिन्याच्या निमित्ताने लोकांसाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी उत्तराखंडमधील हिमालय येथे पूज्य श्री अडवीश्वर यांनी एक महिन्याचे मौन अनुष्ठान सुरू केले आहे. त्यानिमित्ताने काही दिवस प्रवचन आणि सुवासिनींसाठी ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

अशा भक्तिपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणे हे माझे भाग्य आहे. सज्जन, मठाधीश आणि शेकडो मंदिरांमुळे आपला ग्रामीण भाग पुण्यभूमी बनला आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्य आणि आशीर्वादाने मी राज्यात मंत्री झाले आहे. मला संपूर्ण राज्याची सेवा करण्याची आणि बेळगाव ग्रामीण भागाचे नाव सर्वत्र उज्ज्वल करण्याची संधी मिळाली आहे. येत्या काळात मला आणखी सेवा करण्याचे भाग्य मिळावे, अशी मी देवाकडे प्रार्थना करते, असे लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
या कार्यक्रमाला श्री म.नि.प्र. मुरुघेंद्र महास्वामीजी, मुनवाळी सोमशेखर मठाचे श्री म.नि.प्र. प्रभुनीळकंठ महास्वामीजी, म्हैसूरचे पूज्य श्री निरंजन देव, कलगी मेळकुंदाचे पूज्य श्री शशिकुमार देव, पूज्य श्री निरूपादी देव, गुळेदगुडचे पूज्य श्री रेवणसिद्धेश्वर देव, बैलवाडचे पूज्य श्री शंकरलिंग देव, गदगचे वेदमूर्ती सदानंद शास्त्रीजी, सोमनाळचे शरणबसवा के. हिरेमठ, पंचाक्षरी हूगार, गावकरी आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments