महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षण अधिकारी यांना निवेदन सादर करून अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूर्णवेळ शाळा न घेण्याची विनंती केली आहे. या दिवशी गणेश विसर्जन असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते, असे समितीने म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी होती. ती भरून काढण्यासाठी शनिवारी पूर्ण दिवस शाळा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, येत्या शनिवारी अनंत चतुर्दशी असल्याने आणि बेळगावात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने, विसर्जनासाठी मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे आणि घरी परत जाणे कठीण होईल. तसेच, गणेश विसर्जन सोहळ्यामुळे विद्यार्थी शाळेकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शनिवार, ६ सप्टेंबर रोजी शाळांना पूर्ण दिवस सुट्टी जाहीर करावी किंवा नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रातच शाळा भरवावी, अशी मागणी समितीने केली आहे. अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या शनिवारी पूर्णवेळ शाळा घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी युवा समितीचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, समिती नेते शिवाजी हवळांनाचे, उपाध्यक्ष प्रवीण रेडकर, अशोक घगवे, मोतेश बारदेसकर, सूरज जाधव, इंद्रजित धमनेकर, राजू पाटील, सुधीर शिरोळे, अमोल चौगुले आदी उपस्थित होते.


Recent Comments