Belagavi

दरोडेखोर, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Share

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर शहरालगत पहाटेच्या सुमारास पोलिसांनी दरोडा आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या पायाला गोळी मारल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोपी रमेश किल्लार याला आज सकाळी ६ वाजता अटक करण्यासाठी पोलीस गेले असता ही घटना घडली. पोलीस कॉन्स्टेबल शरीफ दफेदार यांना चाकूने भोसकून पळून जात असताना, पीएसआय प्रवीण गंगोळी यांनी आधी हवेत गोळीबार करून त्याला इशारा दिला. मात्र, तरीही आरोपीने पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने, त्याला प्रतिकार करण्यासाठी त्याच्या पायावर गोळी झाडावी लागली. दरोडा, सामूहिक बलात्कार आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या आरोपीला बेळगावच्या बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

या प्रकरणी, बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी माहिती दिली आहे. ‘आरोपीला पकडण्यासाठी गेलो असता त्याने पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी आरोपीवर गोळीबार करून त्याला ताब्यात घेतले. जखमी पोलीस कर्मचारी आणि आरोपीवर बीम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात आरोपीने त्याच्या साथीदारांसह साखळी चोरी केली होती. त्या अनुषंगाने आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले होते. संशयास्पदरित्या फिरत असताना त्याला थांबवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याने घातक शस्त्रांनी हल्ला केला,’ असे ते म्हणाले.

Tags: