Vijayapura

कमी मोबदल्यामुळे कॅनरा बँकेच्या ग्राहकांचा संताप

Share

विजापूर जिल्ह्यातील कॅनरा बँकेच्या दरोड्याची केस देशभर चर्चेत होती. कोणतेही धागेदोरे नसताना, पोलिसांनी बँकेच्या मॅनेजरसह 15 जणांना अटक केली. मात्र, आता बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या चोरीला गेलेल्या सोन्यासाठी कमी मोबदला मिळत असल्यामुळे, त्यांनी बँकेला घेराव घालून जोरदार निदर्शने केली.

25 मे रोजी 59 किलो सोन्याची चोरी झाल्यामुळे चर्चेत आलेली विजापूर जिल्ह्यातील मनगूळी येथील कॅनरा बँक पुन्हा एकदा चर्चेत आहे. पोलिसांनी आरोपींना सोन्यासह पकडल्याने त्यांचे कौतुक झाले. पण आता मनगूळी कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सोन्याचा मोबदला देताना मोठी चूक केली आहे. बँकेत ठेवलेल्या सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 92,000 रुपये दर ठरवून अधिकारी मोबदला देत आहेत. काही ग्राहकांच्या खात्यात पैसे जमाही झाले आहेत. यामुळे सोन्याचे नुकसान झालेल्या ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मनगूळी बँकेच्या आवारात जमा झालेल्या ग्राहकांनी बँक आणि अधिकाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला. सध्याच्या सोन्याच्या दराप्रमाणे मोबदला देण्याची मागणी त्यांनी केली. तर काही जण, ‘आम्हाला तुमचे पैसे नकोत, आमचं सोनं परत द्या,’ अशी भूमिका घेत आहेत.

बँकेच्या लॉकरची डुप्लिकेट चावी वापरून चोरांनी 59 कोटी रुपयांचे सोने आणि दागिने चोरून नेले होते. त्यानंतर मनगूळी कॅनरा बँकेच्या ग्राहकांनी मोठा संताप व्यक्त केला होता. त्यावेळी बँक अधिकाऱ्यांनी, ‘सोनं सापडो किंवा न सापडो, सध्याच्या सोन्याच्या दराप्रमाणे मोबदला देऊ,’ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर विजापूर ग्रामीण पोलिसांनी 15 चोरांना अटक करून 38 किलोपेक्षा जास्त सोनं परत मिळवले. मात्र आता बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपला पवित्रा बदलला आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी फक्त 92,000 रुपये दर ठरवण्यात आला आहे. सध्या बाजारात सोन्याचा दर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, पण इथे फक्त 92,000 रुपये ठरवून बँक अधिकारी ग्राहकांना लुबाडत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बँक अधिकारी मात्र, ‘आम्ही वरिष्ठांशी बोलतो,’ असे सांगत आहेत.
घडलेली घटना लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ग्राहकांना शांत केले. ग्राहकांच्या मागणीनुसार, योग्य दर ठरवण्यासाठी पोलिसांनी बँक अधिकाऱ्याला एक महिन्याचा वेळ दिला आहे. जर तोपर्यंत सोन्याचे दर आणखी कमी झाले तर, या चिंतेत आता ग्राहक आहेत.

Tags: