Belagavi

डिसिसी बँकेच्या निवडणुकीतून चन्नराज हट्टीहोळी यांची माघार

Share

बेळगाव डिसिसी बँकेच्या निवडणुकीत खानापूरमधून रिंगणात उतरलेले आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी अचानक माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी, “त्यांनी माघार का घेतली याचे कारण आम्ही येत्या काही दिवसांत जाहीर करू,” असे सांगत, या घटनेमागील गूढ वाढवले आहे.

बेळगाव डिसिसी बँकेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. काही ठिकाणी संचालक बिनविरोध निवडण्यासाठी तयारी सुरू आहे, तर काही ठिकाणी जोरदार लढती होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी ही निवडणूक होते. खानापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी तयारी केली होती. मात्र, जिल्ह्याचे राजकारण आणि राजकीय हिताचा विचार करून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. याबाबत पुढील काही दिवसांत खुलासा करणार असल्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. “गेले सहा महिने आम्ही खानापूर पिकेपीएस मतदारसंघातून डिसिसी बँकेची निवडणूक लढवण्याची तयारी करत होतो, हे खरे आहे. अनेक सोसायट्यांनी पुढे येऊन आम्हाला पाठिंबाही दिला होता,” असे आमदार चन्नराज हट्टीहोळी म्हणाले.

“जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आणि डिसिसी बँकेचे काम पुढे कसे चालवायचे याबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासोबत आम्ही एक तास चर्चा केली. आम्ही त्यांच्या निर्णयाचे पालन करणार आहोत. अधिक माहिती खुद्द पालकमंत्रीच देतील,” असेही चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.

याशिवाय, “मृणाल हेब्बाळकर निवडणूक लढवणार का, याबाबत अजून चर्चा झालेली नाही. खानापूरचा उमेदवार कोण असेल हेही अद्याप ठरलेले नाही. परंतु, खानापूरच्या जनतेला दिलेली विकासाची कामे सुरूच राहतील,” असे ते पुढे म्हणाले.

एकंदरीत, निवडणूक जवळ येत असतानाच आतापासूनच उत्सुकता वाढवणाऱ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.

Tags: