Vijayapura

येडियुरप्पा कुटुंबाच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या यत्नाळ यांची भाजपमधून उचलबांगडी

Share

विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना भाजपने निलंबित केल्यानंतर, ते नवीन पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या कुटुंबाला आव्हान देणाऱ्या यत्नाळ यांना भाजपने पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. विजयदशमीला नवीन पक्ष स्थापन करण्याचा इशारा यत्नाळ यांनी दिला असताना, आता त्यांच्याच समर्थकांनी नवीन पक्षाचे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली आहे.

येडियुरप्पा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्यावर सतत टीका करणाऱ्या यत्नाळ यांना भाजपने पक्षातून बाहेर काढले होते. पक्षाच्या या कारवाईने विचलित न होता, यत्नाळ यांनी येडियुरप्पा कुटुंबावर टीका करणे सुरूच ठेवले. एका बाजूला ते भाजपमध्ये परतण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जाते, तर दुसऱ्या बाजूला आपल्या समर्थकांद्वारे विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जर विजयेंद्र या पदावर कायम राहिले, तर नवीन पक्ष स्थापन करण्याचा त्यांचा निर्धार पक्का आहे, असा इशाराही यत्नाळांनी दिला होता.

विजापूर शहरात गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सवर ‘भारत राष्ट्रहित पार्टी’चे फोटो लावून यत्नाळ यांच्या जवळच्याच समर्थकांनी त्याचे जोरदार प्रमोशन सुरू केले आहे. BRP नावाच्या या पक्षाचा पूर्ण अर्थ ‘भारत राष्ट्रहित पार्टी’ असा असून, BRP हे आमदार यत्नाळ यांच्या नावाचे संक्षिप्त रूप देखील आहे. पक्षाच्या लोगोमध्ये गाय आपल्या वासराला दूध पाजताना दिसत आहे. जर पक्षाची घोषणा झाली, तर हा पक्ष पूर्णपणे हिंदुत्ववादी असेल, असा संदेश यातून दिला जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, यत्नाळ आपल्या समर्थकांद्वारे नवीन पक्षाच्या संभाव्यतेबद्दल लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत असावेत.

आमदार यत्नाळ गणेश विसर्जन कार्यक्रमात एका मोठ्या सभेचे आयोजन करतात, ज्यात हजारो लोक उपस्थित असतात. त्यामुळे त्या दिवशीच नव्या पक्षाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, जोपर्यंत भाजप हायकमांड विजयेंद्र यांच्याबद्दल कोणताही निर्णय घेत नाही, तोपर्यंत यत्नाळ कोणताही घाईचा निर्णय घेणार नाहीत, असे त्यांच्या जवळच्या वर्तुळात बोलले जात आहे. यत्नाळ यांनी जर नवीन पक्ष स्थापन केला, तर भाजपच्या मतांचे विभाजन होईल आणि त्याचा थेट फायदा काँग्रेसला होईल, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एकंदरीत, आमदार यत्नाळ नवीन पक्ष स्थापन करून भाजपची मते फोडण्याचा इशारा भाजप हायकमांडला देत आहेत की ते खरोखरच नव्या पक्षाची घोषणा करतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Tags: