Belagavi

केएलई संस्थेकडून बी.एस्सी. कृषी महाविद्यालयाचा शुभारंभ

Share

शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीत जावे, या उद्देशाने केएलई संस्थेच्या वतीने उत्तर कर्नाटकात बी.एस्सी. कृषी महाविद्यालयाची सुरुवात करण्यात आल्याचे केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले.

सोमवारी केएलई संस्थेत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “आधी खाजगी कृषी महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी नव्हती. आम्ही यासाठी १२ वर्षांपासून संघर्ष करत होतो. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात कृषी महाविद्यालये आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही खाजगी कृषी महाविद्यालये आहेत. मागील वर्षी हे सरकार आल्यावर त्यांनी आदिचुंचनगिरीला एक महाविद्यालय दिले. आम्ही संघर्ष करून कृषी महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी मिळवली आहे. कर्नाटकात हे दुसरे तर उत्तर कर्नाटकातील पहिले कृषी महाविद्यालय आहे. ६० टक्के प्रवेश सरकार मेरिटवर सीइटीच्या निकालाच्या आधारे देते. ४० टक्के जागा व्यवस्थापन कोट्यासाठी दिल्या आहेत. खाजगी संस्थांना कृषी महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी द्यावी, ही अनेक दिवसांची आमची मागणी होती. धारवाडच्या कृषी विद्यापीठात गेल्यावर मी पाहिले आहे की, ९० टक्के विद्यार्थ्यांना शेती नाही. कृषी पदवी घेतलेले विद्यार्थी बँक किंवा इतर क्षेत्रांमध्ये नोकरी शोधतात. आपल्याला कृषी महाविद्यालयाची गरज का आहे, तर ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे, त्यांच्या मुलांनी कृषी ज्ञान घेऊन शेतीत जावे, या दृष्टीने हे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. धारवाड विद्यापीठातून निवृत्त झालेले हूगार यांना डीन म्हणून नेमण्यात आले आहे. ६० एकर बागायती जमीन खरेदी करण्यात आली आहे. जुन्या सीबीएसई शाळेच्या इमारतीत महाविद्यालय सुरू झाले असून, पुढील दोन वर्षांत वसतिगृहांसह इतर पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल.”

यावेळी केएलई संस्थेचे व्यवस्थापन संचालक बसवराज पाटील, कृषी महाविद्यालयाचे डीन हूगार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: