पश्चिम घाटात चांगला पाऊस पडत असल्यामुळे येथील धबधबे तुडुंब भरून वाहत असून, ते पर्यटकांना आकर्षित करत आहेत. यातच बेळगावनजीकचा किटवाड धबधबा निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग ठरत आहे.

चोहीकडे हिरवेगार डोंगर, डोंगरावरून येणारे पाणी चेक डॅममध्ये साठून हळूवार वाहत येते आणि त्यानंतर खाली कोसळणारा पाण्याचा प्रवाह पाहताना दोन डोळेही कमी पडतात, असे हे किटवाड धबधब्याचे विहंगम दृश्य आहे. रविवार असल्यामुळे वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी येथे दिसून आली. बेळगावपासून केवळ २० किलोमीटर अंतरावर असलेला हा किटवाड धबधबा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात येतो. कोसळणाऱ्या धबधब्याखाली उभे राहून युवक-युवतींनी आनंद घेतला. त्यांनी फोटो काढून जल्लोष केला. काही युवकांनी तर चेक डॅममध्ये पोहून आपले धाडस दाखवले.
बेळगावहून कांग्राळी केएच, अलतवाड क्रॉस, अगसगी, चलुवेनहट्टी, हंदिगनूर मार्गे किटवाड धबधब्याला जावे लागते. हंदिगनूर हे कर्नाटकचे शेवटचे गाव असून, तिथून अवघ्या ५ किलोमीटरवर हा धबधबा आहे. बेळगावच्या लोकांसाठी हे अर्ध्या तासाचेच अंतर आहे. धबधब्याच्या खालपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, पाय घसरून पडण्याची आणि जखमी होण्याची शक्यताही जास्त आहे. येथे पायऱ्यांची व्यवस्था केल्यास पर्यटकांना मोठा दिलासा मिळेल. पायऱ्या नसल्यामुळे अनेक लोक वरूनच धबधबा पाहून निराश होऊन परत जातात. तसेच, धबधबा पाहण्यासाठी हजारो लोक येतात. मात्र, येथे कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही, अशी पर्यटकांची तक्रार आहे.
किटवाड धबधब्याच्या वरून पाहताना पाय घसरून अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे सुरक्षित अंतर राखणे योग्य ठरेल. वेडा धाडस दाखवून जीव गमावल्यास आपल्या जिवाला तुम्ही स्वतः जबाबदार असाल, हे देखील गांभीर्याने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.


Recent Comments