जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा उद्घाटनासाठी बुकर पारितोषिक विजेत्या कन्नड लेखिका भानू मुश्ताक यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, या निवडीवरून मतभेद आणि विरोध व्यक्त होत असून विशेषतः विजापूर शहर आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनीही आपला विरोध दर्शवला आहे.

जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. २२ सप्टेंबर रोजी दसऱ्याला सुरुवात होणार आहे. यावर्षी म्हैसूर दसऱ्याच्या उद्घाटनासाठी बुकर पारितोषिक विजेत्या कन्नड लेखिका भानू मुश्ताक यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज (२२ ऑगस्ट) अधिकृत घोषणा केली आहे. मात्र, या निवडीवरून मतभेद आणि विरोध व्यक्त होत आहेत. विशेषतः विजापूर शहर आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनीही आपला विरोध दर्शवला आहे.
या संदर्भात यत्नाळ यांनी आपल्या ‘एक्स’ खात्यावर पोस्ट करत म्हटले आहे की, “मी लेखिका आणि कार्यकर्त्या म्हणून भानू मुश्ताक यांचा वैयक्तिकरित्या आदर करतो. मात्र, देवी चामुंडेश्वरीला पुष्प अर्पण करून आणि दिवा लावून दसऱ्याचे उद्घाटन करणे त्यांच्या वैयक्तिक धार्मिक श्रद्धेच्या विरोधात आहे. इस्लाम मूर्तीपूजेचा धिक्कार करतो आणि फक्त एका देवावर व एका ग्रंथावर विश्वास ठेवतो, यावर त्यांची अजूनही श्रद्धा आहे की, सर्व मार्ग शेवटी एकाच मोक्षाकडे जातात, यावर त्यांचा विश्वास आहे, याचे त्यांनी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. हे स्पष्टीकरण दिल्याशिवाय दसऱ्याचे उद्घाटन करणे योग्य नाही. मात्र, दसरा महोत्सवाचा भाग असलेल्या सांस्कृतिक किंवा कविसंमेलनासारख्या साहित्यिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी पाहुणे म्हणून त्या नक्कीच योग्य आहेत.” असे म्हटले आहे.


Recent Comments