Belagavi

बेळगावात एबीव्हीपीचे केएसआरटीसी विरोधात आंदोलन

Share

शालेय विद्यार्थ्यांचे बसेसअभावी शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यानी बेळगावमधील मध्यवर्ती बस स्थानकावर निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.  विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी आज एबीव्हीपीच्या नेतृत्वाखाली बससेवेबाबत केएसआरटीसी विरोधात मध्यवर्ती बस स्थानकात एकत्र आले आणि त्यांनी जोरदार निदर्शने केली.

यावेळी विद्यार्थिनींनी सांगितले की, ‘हलगा गावासाठी बसेस थांबत नाहीत. याठिकाणी चालक बस न थांबवताच पुढे निघून जातात. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांना पोहोचायला उशीर होतो, परिणामी शैक्षणिक नुकसान होत आहे. आम्हाला सकाळपासून 3-4 तास वाट बघावी लागते. आमच्या गावासाठी वेगळी बस द्या. जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. महिलांऐवजी विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सोय करून द्या.’ चंदगडला जाणारी बस खनगावला येत नाही, त्यामुळे खनगावला वेगळी बस द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.ग्रामीण भागात योग्य बस व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांत जाण्यासाठी अडचण येत आहे. बसेसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच चालक काही ठिकाणी बसेस थांबवत नाहीत. आमच्या समस्यांचे निराकरण होईपर्यंत आम्ही मध्यवर्ती बस स्थानकावरच धरणे आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

‘राज्य सरकारने महिलांना मोफत प्रवासाची ‘भाग्ये’ दिल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. बसेसमध्ये महिलांचा प्रवास जास्त असल्याने विद्यार्थ्यांना बसायला जागा मिळत नाही. तीन-चार वेळा विनंती करूनही कोणीही लक्ष देत नाही. केएसआरटीसीचे जिल्हा नियंत्रक फक्त आश्वासने देत आहेत,’ अशी नाराजी प्रथम पाटील यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्यास, केएसआरटीसी कार्यालयाला घेराव घालून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Tags: