
जत्रांमध्ये कोंबड्यांची किंवा मेंढ्यांची झुंज पाहणे हि सामान्य बाब आहे, पण सध्या गावांमध्ये ट्रॅक्टरच्या लढतींची क्रेझ खूप वाढली आहे. या धोकादायक लढाईत प्राणही जाऊ शकतो, तरीही हा खेळ जत्रेमध्ये एक ‘ट्रेंड’ बनला आहे. विजापूरमधील अशाच एका जीवघेण्या लढाईत एका तरुणाची बोटे कापली गेली.

बसवण बागेवाडी शहरातील बसवेश्वर जत्रेच्या निमित्ताने ‘करवे’ आणि ‘बसवण बागेवाडी गेळ्यार बळग’ या मंडळांनी ही ट्रॅक्टरची लढाई आयोजित केली होती. कोंबड्यांच्या झुंजीप्रमाणे ट्रॅक्टरमध्ये लढाई लावणे ही एक अनोखी गोष्ट होती. ५५ एचपी क्षमतेपेक्षा कमी असलेल्या ट्रॅक्टरमध्ये ही लढाई झाली. यामध्ये दोन ट्रॅक्टरच्या मागच्या भागाला लोखंडी रॉडने जोडले जाते आणि दोन्ही ट्रॅक्टर्स एकमेकांना ओढतात. जो ट्रॅक्टर दुसऱ्या ट्रॅक्टरला ओढून खेचून नेतो, तो जिंकतो. या स्पर्धेत ३० हून अधिक ट्रॅक्टर मालकांनी सहभाग घेतला होता. एका बाजूला ट्रॅक्टरच्या इंजिनचा आवाज आणि दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांचा जोरदार जल्लोष सुरू होता. अपेक्षेपेक्षा जास्त प्रेक्षक ही लढाई बघायला आल्याने, त्यांना सांभाळण्यासाठी आयोजकांना खूप मेहनत घ्यावी लागली.
“ही स्पर्धा लोकांच्या मागणीमुळे आयोजित केली होती. लोकांना ट्रॅक्टर ओढण्याची स्पर्धा बघायला खूप आवडते. त्यामुळे आम्ही ती आयोजित केली,” असे आयोजक गुरुराज वंदाल यांनी सांगितले.
यापूर्वी अशा स्पर्धांमध्ये अपघात आणि जीवितहानी झाल्यामुळे अनेक ठिकाणी त्यावर बंदी घालण्यात आली आहे. बसवण बागेवाडीमध्येही पोलिसांनी ट्रॅक्टरच्या लढाईवर बंदी घातली होती. मात्र, आयोजकांनी पोलिसांशी वाद घालून, इतर जिल्ह्यांमध्येही अशा स्पर्धा होतात, आम्ही गेल्या दोन वर्षांपासून यशस्वीपणे या स्पर्धा आयोजित करत आहोत आणि कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची जबाबदारी घेतो, असे सांगत ही स्पर्धा पार पाडली. मात्र, याच वेळी एक दुर्घटना घडली. लढाई पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणाची दोन बोटे कापली गेली. आयोजकांनीच त्याला रुग्णालयात दाखल करून त्याच्या उपचाराची व्यवस्था केली.
“मी काल रात्री इथे आलो होतो. ट्रॅक्टरची ही लढाई पाहायला खूप गर्दी जमली होती. मी स्वतः जाऊन आयोजकांशी बोललो आणि त्यांना ट्रॅक्टरची लढाई सुरू न करण्याची विनंती केली. पण त्यांनी माझं ऐकलं नाही आणि ही स्पर्धा सुरू केली,” असे बसवण बागेवाडी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अशोक हारिवाळ यांनी सांगितले. एकंदरीत, ग्रामीण भागात ट्रॅक्टरची ही लढाई खूप ट्रेंड होत आहे. ही क्रेझ इतकी वाढली आहे की, आयोजक पोलीस आणि अधिकाऱ्यांशीही वाद घालून अशा स्पर्धा आयोजित करत आहेत. धोकादायक खेळांपासून तरुणांनी दूर राहणे महत्त्वाचे आहे.


Recent Comments