‘मुस्लिम युवतीशी विवाह करणाऱ्या हिंदू तरुणांना ५ लाख रुपये देऊ’, अशा विजापूरचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा निषेध करत विजापूरमधील मुस्लिम नेत्यांनी यत्नाळ यांच्यावर जोरदार टीका केली असून त्यांना थेट आव्हान दिले आहे.

‘आमच्या समाजातील मुलींबद्दल असे बोलणे चुकीचे आहे. तुमच्या कुटुंबातील मुलीचा विवाह मुस्लिम तरुणासोबत लावून द्या, आम्हीच तुम्हाला १ कोटी ११ लाख रुपये देऊ’, असे आव्हान मुस्लिम नेत्यांनी दिले आहे. यत्नाळ यांनी समाजात तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक विधाने करू नयेत. त्यांनी क्षेत्राच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही मुस्लिम नेत्यांनी केली आहे.
दरम्यान, यत्नाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम तरुणांनी आलमेल शहरात त्यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवले. ‘तुम्ही तुमच्या घरातील मुलीचे लग्न मुस्लिम तरुणासोबत लावून दिल्यास, आम्ही तुम्हाला १ कोटी ११ लाख रुपये देऊ’, असे मुस्लिम नेते हमीद मुश्रीफ यांनी जाहीर केले. यत्नाळ यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही समाजांत द्वेष आणि तणाव निर्माण झाल्याचे मत अनेक मुस्लिम नेत्यांनी व्यक्त केले आहे. यत्नाळ यांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. हा वाद कुठे थांबणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


Recent Comments