Belagavi

बनावट योग उपकरणे बनवून फसवणूक

Share

बनावट योग उपकरणे बनवून फसवणुकीचा गुन्हा दाखल

नऊ वर्षांपूर्वी आपल्या योग केंद्रात उपचारासाठी आलेल्या काही लोकांनी, उपकरणांचे गुपित चोरून तसेच बनावट उपकरणे तयार करून दुसरे योग केंद्र सुरू केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

याबद्दलची सविस्तर माहिती अशी की, भाग्यनगर, सातवा क्रॉस येथील रहिवासी उषा अभय केस्ते (वय ५१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संत मीरा रोड, अनगोळ येथील राजाराम बाचीकर, राजू कोतींबीरकर मंदिरा जवळ राहणारे मोहन खांडेकर आणि मोहन लाड (भाग्यनगर, सातवा क्रॉस) आणि हिंदवाडीतील गणेश मंदिरा जवळ राहणारे गुरुप्रसाद पावस्कर यांचा समावेश आहे.

उषा केस्ते यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या योग सहायक म्हणून काम करतात. २०१६ मध्ये काहीजण त्यांच्याकडे योग उपचारासाठी आले होते. त्यांनी ज्या उपकरणांवर उपचार घेतले, ती उपकरणे चांगली असल्याचे पाहून आरोपींनी त्यांची लांबी, रुंदी आणि इतर माहिती घेतली. उषा केस्ते यांनी २० वर्षांच्या अभ्यासातून ही उपकरणे तयार केली होती. मात्र, संशयितांनी त्याच उपकरणांसारखी बनावट उपकरणे तयार करून १८ जुलै २०२५ पासून भाग्यनगर, दुसरा क्रॉस येथे स्वतःचे ‘योग हेल्थ फिटनेस सेंटर’ सुरू केले आहे. बनावट उपकरणे तयार करून आपली फसवणूक आणि विश्वासघात केल्याचा आरोप उषा केस्ते यांनी केला आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, निरीक्षक परशुराम पुजारी पुढील तपास करत आहेत.

Tags: