बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संस्थेला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

हुक्केरी तालुक्यातील विद्युत सहकारी संस्थेची निवडणूक जवळ येत असल्यामुळे सतीश जारकीहोळी यांनी गेल्या एका महिन्यात चौथ्यांदा संस्थेला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले आणि वीजपुरवठा संबंधित समस्या तात्काळ सोडवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना सुरळीत व योग्य दर्जाचा वीजपुरवठा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी रस्ते, पिण्याचे पाणी, गटार, पथदिवे, उपसा सिंचन सुविधा आणि घरांच्या बांधकामासारख्या मूलभूत सोयीसुविधांची मागणी केली. घोडगेरी जिल्हा पंचायतचे माजी सदस्य भीमन्ना रामगोनाट्टी आणि वकील भीमसेन बागी यांनी होसूर गावातील बागायत शाळेजवळ नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीज जोडणी देण्याची विनंती केली. तसेच, महसूल आणि सर्वेक्षण विभागातील समस्यांबद्दलही त्यांनी माहिती दिली.
याशिवाय, मंत्री जारकीहोळी यांनी विद्युत सहकारी संस्थेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारून त्यांच्या समस्यांवर तात्काळ लक्ष देण्याचे निर्देश संस्थेचे अध्यक्ष जयगौडा पाटील यांना दिले.
यावेळी राहुल जारकीहोळी, विजय रवदी, चंद्रशेखर पाटील, राजेंद्र पाटील, जयगौडा पाटील, शशीराज पाटील, कुणाल पाटील, शानुल तहसीलदार, ऋषभ पाटील, बंडू हतनूरे, अमर नलवडे, मौनेश पोतदार, संतोष मुडसी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments