Belagavi

बेळगावात लोकायुक्त प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी बैठक

Share

बेळगाव जिल्ह्याला आदर्श आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन लोकयुक्त न्यायाधीश बी.एस. पाटील यांनी लोकायुक्त प्रकरणांच्या निवारणासंदर्भात झालेल्या प्रगती आढावा बैठकीत केले. बेळगावमधील सुवर्ण विधान सौधमधील सेंट्रल हॉलमध्ये बुधवारी (६ ऑगस्ट) विविध विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत लोकयुक्त प्रकरणांच्या निवारणासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

लोकायुक्त न्यायाधीश बी.एस. पाटील यांनी सरकारी कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.. ‘सरकारी काम म्हणजे देवाचे काम’ हे ब्रीद जपून अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे. जिल्ह्यातील तलावांचे रक्षण करणे आणि सरकारी इस्पितळांची दयनीय अवस्था सुधारणे ही अधिकाऱ्यांची कर्तव्ये असून, या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गेल्या एका वर्षात अनेक प्रलंबित कामांना गती देण्यात येत आहे. जिल्ह्यातील तलावांच्या संरक्षणासाठी आणि अतिक्रमणे हटवण्यासाठीही पावले उचलण्यात येत आहेत. तसेच, भ्रष्टाचारमुक्त समाज घडवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सांगितले की, “अंमली पदार्थांच्या विक्रीवर लक्ष ठेवून काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.”

जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले की, “शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्यासाठी शाळांमध्ये पालक-शिक्षक बैठकांचे आयोजन केले जात आहे. तसेच, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिभावंत विद्यार्थी शोधण्यासाठी कार्यक्रम घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.” या बैठकीत परिवीक्षाधीन आयएएस अधिकारी अभिनव जैन, लोकयुक्त सचिव श्रीनाथ, अतिरिक्त निबंधक प्रकाश नाडीगेर, सी. राजशेखर, रमाकांत चौवेन, शुभवीर जैन, स्वीय सहायक श्रीकांत के., बेळगाव लोकयुक्त पोलिस अधीक्षक हनुमंतराय आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: